राज्यात काही ठिकाणी पारा २ अंश सेल्सिअस पर्यंत जाणार

मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:04 IST)
पुढील पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील किमान तपमान एक अंकी झाले आहे. त्यामुळेच ६ ते ९ अंश सेल्सिअसमध्ये नोंद होत आहे. आता हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे तपमान ३ ते ५ अंशांनी घटणार असल्याने राज्यात काही ठिकाणी पारा २ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
येत्या पाच दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत थंडी कायम राहणार असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत थंडीची लाट कायम राहणार आहे. तसेच, थंडीची तीव्रता वाढत जाणार आहे.
 
मध्यप्रदेश व्यतिरिक्त, पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये सामान्य थंडीपासून तीव्र थंडीपर्यंतची परिस्थिती बदलणार आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात पुढील पाच दिवस थंडीची लाट राहणार आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार, बंगाल, ओडिशा, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि राज्याच्या विविध भागांमध्ये दाट ते अतिदाट धुके पडण्याची शक्यता आहे. परिणामी, दळणवळणावर त्याचा प्रभाव राहण्याची चिन्हे आहेत.
 
महाराष्ट्रात सध्या किमान आणि कमाल तपमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील सर्वात कमी तपमानाची नोंद निफाडमध्ये ४.५ अंश सेल्सिअस झाली आहे. तर, नाशिकमध्ये ६.३ अंश सेल्सिअस तपमान नोंदले गेले आहे. थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती