बैलगाडा शर्यतीमध्ये बैलजोडी थेट प्रेक्षकांवर आल्याने तीन जखमी

गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (11:25 IST)
रायगड: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. अशात राज्यात आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येऊ लागलं आहे. रायगड मध्ये सुद्धा बुधवारी एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली आहे. बैलजोडी थेट प्रेक्षकांवर आल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. 
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे  पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांच्या अंगावर आली. याच स्पर्धेदरम्यान आणखी एका बैलगाडीचे बैल उधळले व सैरावैरा पळू लागल्याने बैलगाडी मालक जखमी झाला. ही स्पर्धा बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी जमली होती. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती