केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उमेदवारांना सी-सॅट पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर एमपीएससीनेही सी-सॅट पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जात असताना एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उत्तीर्णतेच्या अटीमुळे नुकसान होत असल्याचे सांगत राज्यभरातील उमेदवारांकडून सी सॅट पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात येत होती. त्या बाबत स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून निवेदन देण्यासह आंदोलनेही करण्यात आली.