"तुम्ही मला २०१९च्या निवडणुकीमध्ये निवडून दिले नसते, तर मी आत्महत्या करणार होतो," असे खळबळजनक वक्तव्य परभणीतील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला. रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ची विधानसभा निवडणुक ही तुरुंगातून लढवली होती. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला होता. यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यावेळी त्यांची काय मनस्थिती होती, हे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये रत्नाकर गुट्टे म्हणाले की, "तुम्ही माझा परिवार आहात. माझे जगणे आणि मरणे हे सर्वकाही या परिवारासाठी आहे. तुम्ही मला जीवनदान दिले आहे. मी जर त्यावेळेस निवडणूक हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. मी खोटे बोलत नाही आणि बोलणारही नाही, तुम्ही निवडून दिल्यामुळे मी आता जे काही जगतोय ते माझ्यासाठी बोनस आहे. त्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी आहे," अशा भवन त्यांनी यावेळी वव्यक्त केल्या.