संकट आले की परप्रांतीय आधी पळणार, मी बोललोच होतो : राज

शुक्रवार, 8 मे 2020 (15:39 IST)
‘करोनामुळे आज जी परिस्थिती उद्‌भवली आहे, त्यावर माझ्याकडे, तुमच्याकडे, राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे... अगदी कुणाकडेच उत्तर नाही. संपूर्ण जग या संकटात चाचपडतं. त्यामुळेच उगाच टीका करून कुणाचे ‘मॉरल डाऊन' करू नका', अशी सुस्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वपक्षी बैठकीत मांडली. संकट आले की परप्रांतीय आधी पळणार, हे मी बोललोच होतो, अशा कठोर शब्दांत यावेळी महाराष्ट्रातून आपापल्या राज्यात परतत असलेल्या मजुरांवर राज यांनी निशाणा साधला.
 
मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या सर्वपक्षी बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी आपली मते परखडपणे मांडली. राज्यात कोरोनामुळे उद्‌भवलेल्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबईची अशी परिस्थिती मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, असे नमूद करत त्यांनी आपल्या भावना सांगितल्या.
 
पोलिसांच्या जागी एसआरपी लावणे याचा अर्थ पोलीस कमी पडले असे नाही. दीड महिना काम करून त्यांच्यावर ताण आला आहे, तो यामुळे कमी होईल, असे नमूद करत राज यांनी या निर्णयाचे समर्थन केले. कंटेंटेंट झोन तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवाला हवा, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील छोटे दवाखाने सुरू करायला हवेत. एपीएससीचे जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांना त्यांच्या घरी पोहोचवाला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली. सरकारी कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार या सर्वांच्या सुरक्षेबाबतही राज यांनी महत्त्वाच्या  सूचना केल्या. सरकारचा लॉकडाउनचा नेमका प्लान काय आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
परप्रांतीयांवर निशाणा परराज्यातील मजुरांवर राज यांनी जुन्या भाषणांचा संदर्भ देत निशाणा साधला. मी जुन्या भाषणांत सांगितले होते, अडचण आली की हे परप्रांतीय सर्वात आधी निघून जातील आणि आता तेच घडते यातून बोध घेऊन परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधने आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. जे परप्रांतीय मजूर आज बाहेर गेले आहेत, ते परतआल्यावर त्यांची तपासणी करून व नोंदणी करूनच त्यांना महाराष्ट्रात घ्यावे, अशी सूचना राज यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती