कायदा हातात घेतल्यास राज्य सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून भडकवण्यात येत असून त्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. सदावर्ते यांनी एकही नवीन मागणी कर्मचाऱ्यांची मान्य करुन घेतली नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांविरोधात सामंजस्याने भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या कर्मचाऱ्यांना भडकवण्यामागे कोणाचा हात आहे. याची चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही अनिल परब म्हणाले आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना कायदा हातात घ्याल तर राज्य सरकार हातावर हात घेवून गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे. अनिल परब म्हणाले की, आम्ही कर्मचाऱ्यांच्याबाबत सुरुवातीपासून सहानुभूतीची भूमिका घेतली आहे. गेल्या पाच महिन्यापासून संप सुरु होता. तरी देखील हा शांतपद्धतीने संप सुरु होता. राज्य सरकारने कधीही विरोधात भूमिका घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी भडकाऊ भाषणे केली असताना देखील राज्य सरकारने नेहमीच सामंजस्यची भूमिका घेतली आहे. परंतु कायदा हातात घेतल्यावर राज्य सरकार हातावर हात घेवून बसणार नाही. कर्मचारी आमचेच आहेत. त्यांच्याबाबत आजही सहानुभूतीचे धोरण आहे. आम्ही कोणावरही नाराज नाही. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हावे, एसटी सुरळीत व्हावी, जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु कायदा हातात घेऊन कोणी कर्मचाऱ्यांना भडकावणार असेल तर त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.