राज्याच्या राजकारणात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा आणि कामाल लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आज रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केल्याचे वृत्त आहे. राज्यातील सध्याच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. अनेक लोकांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पाहिलेला देखील नाही. सत्ता आली तर मी तुम्हालाच सत्तेवर बसवेन, मी सत्तेत बसणार नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.
तसेच मी तुम्हाला सत्तेत बसवणार, असे आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी मनसैनिकांना दिले. सध्या जनतेमध्ये मनसेबाबत सकारात्मक वातावरण आहे. येत्या दिवाळीमध्ये लोकांमध्ये मिसळा, मनसेचा प्रचार करा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच तुम्ही काम करा विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे.