आरक्षण न दिल्यास धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

सोमवार, 31 डिसेंबर 2018 (10:45 IST)
विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला निवडून द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं स्पष्ट वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं पण ते पाळलं नाही. आगामी लोकसभेच्या निवडणुकीआधी आरक्षण न दिल्यास धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी स्पष्ट तंबी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली. लातुरात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते आजलातूरशी बोलत होते. 
 
१५ दिवसात धनगर समाजाचे सर्व आमदार आणि वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सगळी व्यथा सांगून झाल्यासही सरकारने सकारात्मक कृती न झाल्यास आंदोलनाचे हत्यार तीव्र केले जाईल असा एकमुखी ठराव या बैठकीत घेण्यात आला.
 
धनगर महासंघाच्या कार्यकरिणीच्या बैठकीत समाजाचे संघटन आणि आरक्षण या विषयावर सांगोपांग चर्चा झाली. आंदोलनाची पुढची दिशा ठरली. धनगर महासंघाचे अध्यक्ष आ. रामहरी रुपनवर, कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संभाजी बैकरे, मल्हार सेना प्रमुख बबनराव रानगे, धनगर महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ गाडेकर, प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सिताफळाचे नामांकित वाण तयार केल्याबद्दल राष्ट्रीय तज्ञ नाना कसपटे, सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चरित्र लिहिल्याबद्दल शिक्षकरत्न पुरस्कार विजेते माजी प्राचार्य मधुकर सलगरे यांचा या बैठकीत सत्कार करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती