मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तर...
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (23:08 IST)
प्राजक्ता पोळ
काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेसोबत युती करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची मागणी केली आहे.
4 फेब्रुवारीला मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये अल्पसंख्याक नगरसेवक सोडून इतर काही नगरसेवकांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असताना महापालिकेत शिवसेना विरोधात कोणचे मुद्दे घेऊन सामोरं जायचं? असा प्रश्न उपस्थित केला.
पण अल्पसंख्याक नगरसेवकांनी शिवसेनेसोबत युती केल्यामुळे कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता असल्याचं बोलून दाखवलं.
कॉंग्रेस नगरसेवकांमध्ये असलेल्या या दोन मतप्रवाहामुळे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार? खरंच कॉंग्रेस शिवसेनेसोबत युती करणार का? जर युती केली तर त्याचे काय परिणाम होतील? याबाबत हा आढावा...
कॉंग्रेस नगरसेवकांमध्ये युतीबाबत दोन मतप्रवाह का?
2019 साली राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कॉंग्रेस काम करत आहे. राज्यात एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत कॉंग्रेस विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत होते. पण राज्यात एकत्र असल्यामुळे प्रत्येक मुद्याला प्रकर्षाने विरोध करताना कॉंग्रेसची कोंडी होतेय.
राज्यात एकत्र असताना मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेविरोधी कोणते प्रचाराचे मुद्दे लोकांसमोर ठेवणार? जरी शिवसेनेविरोधात मुद्दे मांडले तर राज्याच्या राजकारणावर, महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होईल, असं काही नगरसेवकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
मुंबईतले उत्तर भारतीय तसेच मुस्लिमबहुल प्रभागावर कॉंग्रेसचं वर्चस्व राहीलेलं आहे. या मतदारांमुळे मुंबईत कॉंग्रेसचं अस्तित्व टिकून आहे. जर शिवसेनेसोबत युती केली तर त्याचा परिणाम या प्रभागातील मतदारांवर होईल आणि कॉंग्रेसला फटका बसेल असं अल्पसंख्याक नगरसेवकांना वाटतं.
या मागणीबाबत आम्ही मुंबई महापालिकेमधील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांना विचारलं असता ते म्हणाले, "काही नगरसेवकांचं म्हणणं आहे की, शिवसेनेसोबत राहावं. काहीचं म्हणणं आहे की, शिवसेनेसोबत जाऊ नये. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असल्यामुळे शिवसेनेच्या विरोधात कसा प्रचार करणार? याबाबत नगरसेवकांच्या मनात शंका आहे. पण यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमचे वरिष्ठ नेते याबाबत मतं जाणून घेऊन अंतिम निर्णय घेतील. "
याबाबत शिवसेनेने मात्र कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.
युतीचे परिणाम काय होतील?
भाई जगताप यांनी मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची पहिलीच घोषणा केली होती. त्यानंतर वारंवार कॉंग्रेस नेत्यांकडून याचा पुर्नउच्चार करण्यात आला.
शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही महाविकास आघाडीने यापुढच्या निवडणूका एकत्र लढवाव्यात असं अनेकदा सार्वजनिक ठिकाणी केला. पण कॉंग्रेस 'एकला चलो रे' वर ठाम राहिली. आता पुन्हा युतीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसची युती झाली तर काय परिणाम होतील?
याबाबत बोलताना हिंदुस्तान पोस्टचे पत्रकार सचिन धांजी सांगतात, "शिवसेनेकडे 10-15% मुस्लिम मतदार आहे. कॉंग्रेसकडे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा कॉंग्रेसला कायम फायदा झाला आहे. पण आता परिस्थिती वेगळी आहे."
"जर कॉंग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर 236 जागांपैकी किती जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येतील? सर्व जागा लढवणारी कॉंग्रेस कमी जागांवर समाधानी होईल का? कॉंग्रेसच्या जास्त जागांची मागणी शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होईल का? हे अनेक प्रश्न समोर येतील.
कॉंग्रेसला अनेक तडजोडी कराव्या लागतील. जरी कॉंग्रेसने तडजोडी करून शिवसेनेशी युती केली तरी तडजोंडीमुळे कॉंग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता हा नाराज राहील. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेसने स्वतंत्र लढणे हे युती करण्यापेक्षा काही प्रमाणात फायद्याचे राहिल," असं संजय धांजी सांगतात.
छुपी युती होण्याची शक्यता?
ज्याप्रमाणे नगरपंचायत निवडणूकीत प्रत्येक पक्षाने आपली ताकद सिध्द केली आणि नंतर नगराध्यक्ष बनवण्यासाठी महाविकास आघाडीने स्थानिक पातळीवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तशाच पध्दतीचं छुपं गणित महापालिकेतही दिसू शकतं का?
लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "शिवसेना हा मुंबई महापालिकेतील मोठा पक्ष आहे. त्याच्या खालोखाल कॉंग्रेस आणि मग राष्ट्रवादीचा नंबर लागतो. जर ही तीन पक्षांची युती करायला गेली तर जागा वाटपाचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होईल. जागा वाटपाच्या मुद्यावर मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही होऊ शकते. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसून भाजपला फायदा होऊ शकतो. यामुळे येत्या निवडणुकीत उघडपणे युती करण्यापेक्षा छुपी युती होण्याची जास्त शक्यता आहे.
जिथे शिवसेनेचे मातब्बर उमेदवार आहेत तिथे कॉंग्रेसने ताकदीचे उमेदवार उभे न करणे किंवा कॉंग्रेसच्या जागेवर शिवसेनेने कमी ताकदीचे उमेदवार देणे अशी छुपी युती काही जागांवर होऊ शकते. तेच महाविकास आघाडीच्या फायद्याचं ठरेल."