'या' जिल्ह्यात कोरोना रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल करणार !

शनिवार, 13 मार्च 2021 (08:48 IST)
नाशिक गेल्या महिनाभरात जवळपास सातपट कोरोन रुग्ण वाढल्यामुळे अॅक्शन मोडवर आलेल्या पालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता, होम आयसोलेलेशनच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या कोरोनाबाधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोन रुग्णांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार असून शिक्केधारी व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास पोलिस व पालिकेचे पथक कारवाई करणार आहेत.
 
७ फेब्रुवारीपर्यंत जेमतेम ५५० अॅक्टिव्ह रुग्ण असताना किंबहुना दिवसाला कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सरासरी शंभर इतके असताना गेल्या महिनाभरात सातपट रुग्ण वाढले आहेत. सद्यस्थितीत चार हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यातील ८० टक्के रुग्ण होम आयसोलेलेशन अर्थातच घरगुती अलगीकरणात आहेत. घरीच राहून उपचार घेत असल्याची बाब समाधानकारक असली तरी, ज्यांना तीव्र लक्षणे नाही असे अनेक रुग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
 
असे रुग्ण घराबाहेरच काय परंतु घरातही फिरणे धोकेदायक असून या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या अन्य व्यक्ती बाधित होण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सहाही विभागीय अधिकाऱ्यांना सूचना करीत कोरोनाबाधित व्यक्तीच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून, हातावर शिक्के असलेली व्यक्ती बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येणे शक्य होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती