मी पुन्हा येईन', भाजपाने देवेंद्र फडणवीसांची कविता ट्वीट केल्यामुळे खळबळ
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (21:13 IST)
भाजपाच्या ट्वीटर (एक्स) हँडलवरुन 'मी पुन्हा येईन', या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कवितेचा व्हीडिओ पुन्हा एकदा शेअर झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
हा व्हीडिओ आता अचानक कसा प्रसिद्ध करण्यात आला तसेच तो परत एकदा प्रसिद्ध का झाला यावर चर्चा सुरू आहे.
आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा बदल तर होणार नाही ना असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे.
यावर भाजपातर्फे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीटरवर लिहितात, "हा व्हीडिओ सोशल मीडिया मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हीडिओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये."
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिलली दौरा केला होता. तसेच 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर या ट्वीटमुळे काही बदल महाराष्ट्रात होणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
जेव्हा वर्तमानपत्रात अशी जाहिरात आली होती ....
वर्तमानपत्रातील एका जाहिरातीमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलं होतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना युती सरकारमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं.
सत्ता स्थापनेसाठी वर्षभरापूर्वी एकत्र आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, अशी चर्चा सुरू झाली होती.
पण पालघरमध्ये 15 जूनला झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर आले, आणि तिथे बोलताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देवेंद्रजी पाच वर्षं मुख्यमंत्री होते, त्यांच्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला.
आमची युती स्वार्थासाठी झालेली नाही, सत्तेसाठी झालेली नाही, तर गेल्या 25 वर्षांपूर्वी झालेल्या वैचारिक भूमिकेतून झालेली आहे. आमचं सरकार एका विचारांचं सरकार आहे. माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाहीये, गेल्या 15-20 वर्षांपासून आम्ही मित्र आहोत.”
देवेंद्र फडणवीसांनीही जाहिरात वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकत्रित प्रवास करतोय पण गेल्या वर्षंभरात तो अधिक घट्ट झालाय. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याची गरज नाहीये.
ते पुढे म्हणाले, आम्ही सरकार तयार केलं ते खुर्च्या तोडण्याकरता नाही, पद मिळवण्याकरीता नाही तर सामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावा म्हणून. त्यामुळे एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कोणी काही म्हणालं म्हणून या सरकारला काही होईल इतकं तकलादू सरकार हे नाहीये.”
जाहिरात आणि वाद
'त्या' जाहिरातीनंतर अपेक्षेप्रमाणे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.. यात भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही जाहिरात आम्ही दिली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
तरीही पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध बिघडल्याची चर्चा सुरू आहे. यात किती तथ्य आहे? देवेंद्र फडणवीस नाराज आहेत असं का बोललं जातंय? अशाप्रकारच्या जाहिरातीचा राजकीय अर्थ काय? जाणून घेऊया.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना एकमेकांना टाळतायत का?
राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली एका सर्वेक्षणानुसार, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे अधिक लोकप्रिय आहेत अशी जाहिरात प्रसिद्ध झाली.
13 जून रोजी ही जाहिरात बहुतांश मराठी आणि इग्रंजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
13 जून रोजी राज्याची मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या काही नाराज मंत्र्यांची बैठक पार पडल्याचीही माहिती समोर आली. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.
यानंतर काही तासातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या 13 जून या तारखेच्या त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या यादित ते संध्याकाळी 4 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रम, तपोवन मैदान, कोल्हापूर येथे उपस्थित राहणार होते.
परंतु देवेंद्र फडणवीस यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस विमान प्रवास टाळण्यासाठी सांगितल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
बुधवारी (14 जून) वर्तमानपत्रात पुन्हा दुसरी जाहिरात छापून आली. ह्या जाहिरातीत मात्र जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा या मथळ्याखाली जनतेचा कौल भाजप- सेना युतीलाच असल्याचं सर्वेक्षणानुसार म्हटलं गेलं. परंतु ह्याने फारसा काही फरक पडला नाही.
याचं कारण म्हणजे बुधवारी (14 जून) दिवसभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र कार्यक्रम करण्याचं टाळलं असं चित्र आहे. 14 तारखेला दोन्ही नेते दिवसभर मुंबईत होते. पण एकमेकांसमोर येण्याचं त्यांनी टाळल्याचं दिसलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांसाठी सरकारी अतिथिगृह सह्याद्रीला होते.
संध्याकाळी साडेचार वाजता राज्य परिवहन महामंडळाचा अमृत महोत्सव कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमालाही जाण्याचं टाळलं.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, “14 जून अकोला आणि 15 जून धाराशिव येथे आमची सभा होती त्यामुळे आम्ही तिकडे जाणार होतो परंतु आम्ही हे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री जाणार नाहीत.”
मुंबईत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला जाण्यास टाळल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेला अधिक बळ मिळालं.
दरम्यान, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं, “देवेंद्र फडणवीस यांचं विमानचं बुकींग होतं. पण सकाळी डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांच्या कानामध्ये पडद्याला प्रॉब्लेम आलेला आहे हा सातत्याने विमान प्रवासामुळे आला आहे. यामुळे काही दिवस विमान प्रवास टाळण्यास सांगितला आहे. यामागे दुसरं कोणतही कारण नाही.”
देवेंद्र फडणीस नाराज असल्याची चर्चा का सूरूय?
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, “भाजप नेत्यांच्या हे जिव्हारी लागलं हे दिसत आहे. पण हे दोन्ही बाजूंनी होत आहे. मग ते शिंदेंच्या पाच मंत्र्यांना वगळायचं असेल किंवा 288 आणि 48 मतदारसंघात निरीक्षक नेमणं असेल, कल्याण डोंबिवली मतदारसंघावर दावा सांगणं असेल किंवा शिंदे गटाला फक्त 40 जागा सोडणार असं बावनकुळेंचं वक्तव्य आहे. त्यामुळे याचा राग एकनाथ शिंदे यांनाही असेल.
त्यामुळे हे दोन्हीकडून होत आहे. त्यामुळे दोघांमधली दरी वाढली असेल. याला जाहिरात निमित्त झालं एवढचं. ही दरी एका दिवसात वाढलेली नाही हे सुद्धा तितकच खरं आहे.”
ते पुढे सांगतात, “एकनाथ शिंदे आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये जेवढा संवाद आहे तेवढा राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात नाही हे यातून दिसतं. ह्या जाहिरातीतून एक संदेश दिला असंही असू शकतं. तुमच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो हे खरं आहे पण माझ्यामुळे तुम्ही सत्तेत आला हे सुद्धा तितकच खरं आहे हा संदेश दिला असं मला वाटतं,”
गेल्या काही काळापासून दोघांमध्ये मतभेद सुरू होते, या जाहिरातीच्यानिमित्ताने हे उघड झालं एवढंच, असंही ते सांगतात.
तर आजारपण पूर्ण राजकीय आहे असं वाटत नाही पण ते बीगर राजकीय आहे असंही कोणी म्हणणार नाही, असं लोकमतचे सहयोगी संपादक यदु जोशी सांगतात.
या घटनाक्रमांचं विश्लेषण करताना ते म्हणाले, “कान दुखणे आणि त्यांनी कार्यक्रमांना न जाणे या गोष्टी एकाचवेळी आल्या हे आपण गृहीत धरलं किंवा कान दुखत असल्यामुळे ते जात नाहीयेत असं जरी मानलं तरी राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार हे कान दुखल्यामुळे ते जात नाहीयेत हे मानायला तयार नाही. त्याचं कारण म्हणजे याला जाहिरातीतून उत्पन्न झालेल्या वादाची किनार आहे.”
“दुसरीकडे ही सुद्धा वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की, देवेंद्र फडणवीस यांनी मोदी@9 या अंतर्गत अकोला आणि धाराशीव येथे होणारी सभा त्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आहेत तिथे मी जाणार नाही, असं ते निवडक राहिले असते तर हा दावा अधिक प्रकर्षाने करता आला असता.
परंतु पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने, कार्यालयाने ठरवून दिलेला आहे तो देखील अटेंड करण्यास ते जात नाहीयेत हा सुद्धा मुद्दा आहे,”
भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहिल्या तर पक्षातली नाराजी स्पष्ट दिसते. त्यामुळे “नाराजी आहे का तर आहे. बावनकुळे, बोंडे, दरेकर यांनीही ती बोलून दाखवली आहे. त्यामुळे वर्ष पूर्ण होत असतानाच नाराजी किंवा कटुता आहे हे कोणी नाकारणार नाही.”
सरकार एक, सत्ताकेंद्र दोन?
2014 मध्ये राज्यात शिवसेना,भाजपचं युती सरकार सत्तेत होतं. त्यावेळीही दोन पक्षात सतत कुरबुरी सुरू होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याच कार्यकाळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक निर्माण झाली.
त्यावेळी शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असताना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आले आणि 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अडिच वर्षात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केलं.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार हे चित्र स्पष्ट झालं, पण 105 आमदारांचं बळ असलेल्या भाजपला मुख्यमंत्रिपद न मिळता ते एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल याची कल्पना महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना नव्हती. तसा अंदाजही कोणालाही नव्हता.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांनी गृहीत धरलं. पण 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार अशी घोषणा झाली.
तर सरकारमध्ये दोन्ही पक्षांना प्रत्येक 9 अशी 18 कॅबिनेट मंत्रिपदं देण्यात आली. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला. एक वर्ष उलटत आलं तरीही विस्तार होऊ शकला नाही.
अभय देशपांडे सांगतात, “मी त्यावेळीही सांगितलं होतं की दोन सत्ताकेंद्र जेव्हा तयार होतात तेव्हा वाद, मतभेद अटळ असतात.” आणि तसंच काहीसं सध्या युती सरकारमध्ये दिसून येतं.
“या जाहिरातीच्या माध्यमातून आणि त्याआधीपासून जे घडतंय त्यातून दोघांनी एकमेकांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे. आता हे प्रकरण अधिक ताणेल असं मला वाटत नाही,” असंही ते सांगतात.
या जाहिरातीच्यानिमित्ताने आणखी एका मुद्याची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे ती म्हणजे दिल्लीच्या आशीर्वादाशिवाय अशी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते का? याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांना दिल्ली भाजपकडून अधिक महत्त्व दिलं जातंय का? असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
याविषयी बोलताना यदु जोशी सांगतात, “आपल्या घरच्या माणसाला दुखावून काही दिवसांपूर्वी आपल्या सोबत आलेल्या व्यक्तीला सुखावण्यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व असं काही करेल इतके वाईट दिवस भाजपमध्ये आलेले नाहीत असं मला वाटतं. भाजपची अजून तितकी काँग्रेस झालेली नाहीय की फडणवीस यांच्या वरचढ दाखवण्यासाठी भाजप हे करेल असं वाटत नाही.”
अभय देशपांडे सुद्धा हेच मत व्यक्त करतात. “हा भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग आहे असं वाटत नाही. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना जो संदेश द्यायचा आहे तो देण्याचा प्रयत्न इथे केला आहे. पाच मंत्री वगळा, एवढ्याच जागा मिळणार ह्या वक्तव्यांनंतर मी काही पपेट नाही हा संदेश त्यांनी दिलाय.”
शिवसेनेकडून सारवासारव तर भाजप आक्रमक
जाहिरातीनंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. बेडकानं कितीही हवा भरली तरी तो हत्ती होत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे.
“ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. उद्धव ठाकरे यांना वाटत होतं की मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आता एकनाथ शिंदे यांना वाटत आहे की ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र,” असंही अनिल बोंडे म्हणाले.
तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले,
“शिवसेनेच्या 50 वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणं थांबवायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना अशी उपमा देणं किंवा ठाण्यापुरतं मर्यादित आहेत असं बोलताना तुम्ही किती मर्यादित आहात याचा विचार करायला पाहिजे.”
13 जूनला जाहिरातीवरून वादंग उठल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही जाहिरात आपण दिली नसल्याचं स्पष्ट केलं. जाहिरात कोणी दिली याची माहिती आम्ही घेऊ असंही ते म्हणाले.
“कोणी काय बोलतं याला महत्त्व नाही. जाहिरात सुधारली जाऊ शकते. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आता आम्ही दीड तास एकत्र होतो. जनतेसाठी स्कीम राबवायच्या आहेत यासाठी एकत्र होतो. दोघे भावाप्रमाणे काम करतात त्यामुळे फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो.
आम्ही जाहिरात दिलेली नाही. जाहिरात ज्याने दिली त्यांना आम्ही विचारू. त्या जाहिरातीचा खुलासा येऊ शकतो. ही लहानशी गोष्ट पकडायची आणि त्यावर राजकारण फिरवायचं हे चुकीचं आहे,” असं ते म्हणाले.
तर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनीही युतीत मतभेद असल्याचं वृत्त फेटाळलं. ते म्हणाले, “माझी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. जे काही सर्वेक्षण आहे ते युतीचं आहे. दोन्ही पक्षांचं आहे. या सर्वेमुळे कुठेही मतभेद नाहीत.”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विषय आता संपला आहे अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“देवेंद्र फडणवीस पाच वर्षं मुख्यमंत्री होते. त्यांची अष्टपैलू कामगिरी आहे. लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलं आहे. पक्षवाढीसाठी काम केलं. एकनाथ शिंदे उत्कृष्ट आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुलना नको. यामुळे आमदार, खासदार, पदाधिकारी यांचं मन दुखावलं आहे. हा विषय आता संपलेला आहे.”
तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “शिवसेनेने जहिरात केली असेल तर ती योग्य नाही. एकनाथ शिंदे लोकप्रिय असो वा देवेंद्र फडणवीस दोघं एकत्रित मिळून दिशा द्यायची आहे. एकमेकांना कमी जास्त दाखवण्यासाठी कोणी खत पाणी घालत असेल तर त्याला बळी पडू नये. यामुळे वातावरण कलुषित होईल.”
“एका हाताने टाळी वाजत नाही. 40 आमदार नसते तर सत्ता नसती. पण भाजपचे तिप्पट आमदार आहेत. त्यामुळे दोघे एकत्रित आले. भाजपने त्याग केला. जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहीले. याचं मुल्यमापन करणार की नाही. वातावरण खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,” असंही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
ही भेट राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती अशी माहिती समोर आली होती. परंतु प्रत्यक्ष भेटीनंतर शिवसेनेतील पाच मंत्र्यांना वगळलं जाणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या.
या पाच मंत्र्यांऐवजी इतरांना संधी द्यावी यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती समोर आली होती.
या पाच मंत्र्यांमध्ये शिंदे गटातील कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री तानाजी शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदिपान भुमरे आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिंदे गटाने या बातमीत काही तथ्य नसल्याचं सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलं.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, “जाणीवपूर्वक काही मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून भाजपने त्यांच्याबाबतीत फेरविचार करावा अशा बातम्या येत होत्यात. यात कुठलीही वस्तुस्थिती नाही. यात तथ्य नाही. शिवसेनेच्या महितीनुसार टेबलवर बसून या बातम्या केल्या आहे. सगळे सरकारचं काम करत आहे.”
या बातम्या चुकीच्या ठरल्या तर आमची माफी मागणार का? मंत्र्यांची नावं, त्यांचे फोटो घेऊन बातम्या चालल्या या चुकीच्या ठरल्या तर तुम्ही माफी मागणार का? असा प्रश्न त्यांनी माध्यमांना केला.
गेल्या काही दिवसांमधला हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतं. आता हा तणाव काही दिवसांत निवळणार की अंतर्गत कलह वाढत जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.