"मी महाराष्ट्रात मंत्री असताना अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अडीच हजार मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हाहाकार माजला होता. त्यावेळी आमचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मला ही नेमकी काय स्थिती आहे, मेळघाटातील 450 गावात एकही रस्ता नाही याबद्दल विचारणा करायचे," असं ते सांगतात.
ते पुढं म्हणाले, "मी मंत्री असल्याने बैठका घेत असायचो. अधिकारीही बैठकीला असायचे. एकदा मनोहर जोशी यांनी त्यांना 'इतकी लोकं मेली तुम्हाला काहीच वाटत नाही का? मुलं शाळेत नाही जाऊ शकत, वीज नाही आणि तुम्ही वन पर्यावरण कायद्यांअंतर्गत काहीच करु देत नाही' अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने 'माफ करा, पण मी असहाय्य आहे, काहीच करु शकत नाही' असं उत्तर दिलं".
"यानंतर मला राहावलं नाही. हे माझ्यावर सोडा, काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, पण मी हे काम करणार असं मी अधिकाऱ्याला सांगितलं. तुम्हाला शक्य झालं तर माझ्या पाठीशी उभे राहा, नाही राहिलात तरी हरकत नाही. मंत्रिपद गेलं तरी चालेल असं म्हटलं होतं," अशी आठवण गडकरींनी सांगितली.