वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी म्हणून माझ्याकडे राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मी स्विकारला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. संजय राठोड यांनी राजीनामा देतानाच आपली भूमिका एक शिवसैनिक म्हणून माझ्याकडे मांडली आहे. त्यानुसार जोवर चौकशी होत नाही तोवर मी पदापासून दूर राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्येच्या निमित्ताने राजकीय चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. विरोधकांकडून गेल्या कालावधीत सत्ताधाऱ्यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे. आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा प्रकार दुर्दैवी असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही माहिती मांडली.
मंत्रीमंडळ बैठकीला जाण्याआधी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांसोबत माझी भेट झाली. पूजाच्या मृत्यूच्या निमित्ताने होणारी उलट सुलट चर्चा पाहता आमच्या मुलीची आणि समाजाची बदनामी थांबवावी अशी मागणी पूजाच्या कुटुंबीयांनी केली आहे. आमचा सरकारवर आणि तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. आपण निश्चित कारवाई कराल असाही विश्वास तिच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.