मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही : उद्धव ठाकरे

सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:21 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली हिंदुत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंचे जे हिंदुत्व होते ते शुद्ध होते, तेच माझे हिंदुत्व आहे.  त्यासाठी मला झेंडा बदलण्याची गरज नाही, हे संपुर्ण जगाला माहिती आहे.”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेचे मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठाकरे यांनी हिंदुत्त्वाबद्दल आपल्या भूमिकेचा पुर्नच्चार केला.
 
राज ठाकरे यांनी २३ जानेवारी रोजी घोषणा केल्याप्रमाणे आज पाकिस्तान-बांगलादेशी घुसखोरांविरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढला. या मोर्चामुळे शिवसेनेकडून हिंदुत्त्वाचा विषय हिसकवण्यात मनसे यशस्वी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. “शिवसेनेने आपले हिंदुत्त्व सोडलेले नाही. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत. मात्र महाराष्ट्राचा विकास हे आमच्या अग्रक्रमावर आहे.”, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती