गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं : खडसे

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (07:58 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची एक ऑडिओ क्लिप  व्हायरल झाली. त्यावरून आता एकनाथ खडसेंनी तीव्र शब्दांमध्ये आगपाखड केली आहे. “गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं आहे. त्यांच्या अनेक निवडणुकांना आर्थिक मदत मी करत आलो आहे. प्रचाराला मी स्वत: गल्लोगल्ली फिरलो आहे. म्हणून आज गिरीशभाऊ इथे दिसत आहेत. माझा दोष इतकाच आहे की मी कुणाचे पाय चाटले नाहीत आणि कुणाची हांजीहांजी केली नाही. ती मला सवयही नाही. आपण अनेकांना घडवतो. अनेक लोकं प्रामाणिक राहतात, काही लोकं गद्दारी करतात. असे प्रसंग जीवनात घडत राहतात”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
 
दरम्यान, यावेळी एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना १९९४-९५मध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण देखील करून दिली. “गिरीशभाऊंना मी आत्ता ओळखत नाहीये. १९९४-९५ मध्ये फर्दापूरला अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हापासून आजतागायत सगळा इतिहास मला माहितीये आणि सगळ्या जनतेलाही माहिती आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणं काही गैर नाही. मी तरी मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलो. तुम्ही तर तिथपर्यंतही जाऊ शकले नाहीत. हांजीहांजी करून तुम्हाला हे सगळं मिळालं आहे. मला स्वकर्तृत्वाने सगळं मिळालं आहे”, असं देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती