भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. यानंतर भुजबळ समर्थकांनी आक्षेप घेत गोंधळ करण्याचा प्रयत्न करताच मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो, असं मत व्यक्त केलं. चंद्रकांत बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणासाठीचा अध्यादेश रद्द केल्याची मागणी केल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. यावरुन दुखावलेल्या बावनकुळे यांनी लोणावळ्यात त्यांच्याच मंचावर येऊन आपली नाराजी व्यक्त केली
बावनकुळे म्हणाले, मी छगन भुजबळ यांना भेटून ३१ जुलै रोजी काढलेला वटहुकुम (अध्यादेश) ३१ जानेवारीला संपेल असं सांगितलं. कारण ६ महिन्यांच्या वर वटहुकुम चालत नाही. या अध्यादेशाचं रुपांतर कायद्यात करावं लागतं. तसं झालं नाही तर तो रद्द होतो. भुजबळांनी आमचं म्हणणं १५ मिनिटं ऐकून घेतलं. तसेच तो वटहुकुम रद्द होऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं. मात्र, त्यांनी या मंचावरुन याबाबत वेगळी माहिती दिली.
३० जुलै रोजीच्या रात्री जागून राज्यपालांची सही आणून वटहुकुम काढण्यापर्यंत या कार्यकर्त्याने काम केलं. त्याच्याबद्दल या मंचावर सांगण्यात आलं की बावनकुळे म्हणाले तो वटहुकुम रद्द करा. भुजबळांनी ओबीसींसाठी मोठं काम केलंय. ते वरिष्ठ नेते आहेत आणि सर्वांसाठी आदरणीय आहेत. पण त्यांना या वयात का खोटं बोलावं लागलं? त्यांना या मंचावर खोटं का बोलावं लागलं याची मला चिंता आहे. हा केविलवाणा प्रकार वाटला. यासाठी मी त्यांची माफी मागतो, कारण ते वरिष्ठ आहेत. पण मी त्यांच्या या आरोपाने दुखावलो गेलो, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.