उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या हातानेच स्वत:चा पक्ष कसा संपवला? याची अनेक कारणं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासह आपल्याला पक्षातून बाहेर का पडावं लागलं? यावरून एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला.
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते? जिथे शिवसेना नाही. जिथे शिवसेना कमजोर आहे, तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो आणि मोठी करतो. नारायण राणेंचा काय गुन्हा आहे? त्यांच्या बाबतीत काय झालं? राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आता तर आम्हाला सगळे भेटतात, आमच्याशी बोलतात. पूर्वी आमच्यावर बंधनं होती. आता आम्ही मोकळे आहोत. आमच्यात विचारांचं अदान प्रदान होतं, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं.
एक आठवण सांगतो म्हणत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “जेव्हा ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती. तेव्हा मी राज ठाकरेंच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं की हा भगवा बाळासाहेब ठाकरेंनी फडकवला आहे. आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली फडकला आहे, हा भगवा उतरू देऊ नका. तेव्हा राज ठाकरेंनी आमची विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. यात आमचं काय चुकलं? पण तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं की हा एकनाथ स्वत:साठी गेला नाही, ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला.”