हॉटेल मालकाने हॉटेलची उधारी परत मिळावी म्हणून सदाभाऊंना भर रस्त्यात अडवलं

शुक्रवार, 17 जून 2022 (09:14 IST)
एका हॉटेल मालकाने आपली सदाभाऊ खोत यांनी २०१४ साली केलेली उधारी परत मिळावी म्हणून थेट त्यांना रस्त्यातच अडवून हुज्जत घातल्याचं समोर आलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी झालेली हॉटेलची उधारी द्या आणि मगच पुढं जा. असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने थेट माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची वाट अडवली.
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते अशोक शिनगारे यांनी उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याचे पैसे अद्यापही दिलेले नाहीत. आज (१६ जून) दुपारी पंचायत समितीच्या आवारातच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना हॉटेल मालकाने अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली. हा सगळ्या प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
 
सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण सोयीस्कररीत्या
दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत सदाभाऊ खोत यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ‘पंचायत राज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यातून या ठिकाणी मी आलो आहे आणि सांगोला तालुक्यातील पंचायत समितीमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावर येण्याचा प्रयत्न याठिकाणी केलेला आहे.’ असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
 
‘हा प्रकार अर्थातच निषेधार्थ तर आहेच. पोलीस स्थानकात आम्ही या संदर्भात तक्रार दिलेली आहे. एका आरोपीला ताब्यातही घेतलेलं आहे. परंतु अशा पद्धतीने सदाभाऊ खोताचा आवाज हा राष्ट्रवादीला कदापिही दाबता येणार नाही.’ असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती