राज्यातील सर्व निवासी, वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष

गुरूवार, 9 मार्च 2023 (09:04 IST)
मुंबई : राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून, त्या जागेचा एफएसआय मोजण्यात येणार नाही. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सांगितले.
 
मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नवीन रस्ते बांधतांना नियमानुसार प्रत्येक ५० किमी अंतरावर शौचालय बांधण्यात येईल. तसेच महिला आयोग आणि महिलांशी संबंधित शासकीय कार्यालयांच्या इमारतींसाठी सुसज्ज जागा देण्याबरोबरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. मुंबईच्या दोन्ही फ्री वे वर महिला शौचालय बांधण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
 
विधानमंडळात महिलांसाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व सुविधा पुरविण्यात येतील. हा कक्ष याच अधिवेशन कालावधीत सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच मंत्रालयातदेखील विधिमंडळाच्या महिला सदस्यांसाठी एक विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती