नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पोलिसांनी हेल्मेट सक्तीबाबत विविध पर्याय अवलंबले आहेत. त्यासही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता थेट जबर दंडाचे हत्यार पोलिसांनी उपसले आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून (१ डिसेंबर) होणार आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना थेट ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.
शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्याचे पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहे. विविध उपक्रमानंतर आता थेट इ चलान कार्य प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे. उद्यापासून ही मोहिम तीव्र करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी नियमीत हेल्मेट वापरावे व दंड टाळावा असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
पोलिस आयुक्त म्हणाले की, शहरात विविध अपघातांमध्ये सातत्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी आम्ही विविध उपक्रम राबविले. रस्ते अपघातातील मृत्यू संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली आहे केली. दुचाकीस्वारांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. मात्र, त्याचा फायदा झालेला नाही. आता हेल्मेट सक्तीचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी शहराच्या ठिकठिकाणी तपासणी केली जाणार आहे. वाहतूक पोलिस चौकात, सिग्नलवर आणि अन्य ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.