राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:56 IST)
राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाला पोषक स्थिती असून, येत्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (१९ सप्टेंबर) कोकण, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
 
१८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या आठवडय़ात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल. त्यानंतरच्या आठवडय़ात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस असेल. इतरत्र पाऊस कमी होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती