राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कँपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश असणार आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्चपासून लागू केलेल्या टाळेबंदीचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहनांना वार्षिक वाहन करात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. ३१ मार्च २०२० ला मागील आर्थिक वर्षांचा पूर्ण वाहन कर जमा केला असेल त्यांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे.
कोरोना काळात आधीच अडचणीत सापडलेल्या मालवाहतूक,प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कँपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. या वाहन मालकांनी त्यांचा एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षाचा संपुर्ण वाहन कर ३१ मार्च २०२० पर्यंत किंवा त्यापुर्वी सरकारजमा केलेला असला तरच त्यांना पुढील आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे.