हवामान विभागाने महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे.
माघारी परतणारा मान्सून मध्य प्रदेश ते बिहार आणि गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील बहुतेक भागात कहर करत आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११,८०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, मराठवाड्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि पिके नष्ट होत आहे . कोकण, गोवा, बिहार आणि ईशान्येकडील मेघालय राज्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत या भागात तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात वादळाचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की पश्चिम विदर्भ आणि लगतच्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकण प्रदेशातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, जो १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
रविवारी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.