येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी

शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (08:26 IST)
भारतीय हवामान विभागाने येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. विदर्भातील काही भागांमधिये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. आगामी ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याआधी अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी सावधानतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रात अनेक भागात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. अनेक ठिकाणी सरासरी तापमान हे ४० डिग्री सेल्सिअस इतके आहे. सर्वाधिक अशा तापमानाची नोंद ही ब्रम्हपूरी, वर्धा, अकोला आणि जळगाव येथे झाली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होता. राज्यात अकोल्यात सर्वाधिक अशी ४५.४ इतकी तापमानाची नोंद झाली. याठिकाणी ०.६ डिग्री सेल्सिअस अशी एकाच दिवसात झालेली वाढ आहे. विदर्भात सर्वाधिक अशा तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यात झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक अशी तापमानाची नोंद झालेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती