राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली.यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्ती, अध्यक्ष दिलीप दास, सचिव मृणाल पुरकायस्थ व बंगाली भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंगाली समाजाने राज्याला उत्तम डॉक्टर, उत्तम शिक्षक, उत्तम संगीतकार, गायक, खेळाडू आणि विचारवंत दिले आहेत. मुंबई आणि राज्याच्या विकासात बंगाली भाषिक लोकांचे योगदान मोठे आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी दुर्गा पूजेसारखे सण महत्त्वाचे आहेत. विविध धर्म व पंथाच्या लोकांना निमंत्रित करून दुर्गोत्सव सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बंगाल क्लब कडे खेळाच्या सुविधा आहेत. या क्लबच्या माध्यमातून देशासाठी उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.