मुंबई पनवेल: हनुमान चालीसा आणि त्याविषयी असलेली भावना व त्यातून झालेलं प्रतिकात्मक आंदोलन राजद्रोह कसा होऊ शकतो, असा सवाल भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या यांनी पनवेलमध्ये माध्यमांशी संवाद साधला. कोर्लई अलीबाग येथील 19 बंगला घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसंच सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांचे कनेक्शन फक्त ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांसाठी झाले असल्याचे अधोरेखित केले. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची संशयास्पद भूमिका असल्याचंही सोमय्या म्हणाले.
हनुमान चालीसाचे मातोश्री बाहेर पठण करण्याचा प्रामाणिक उद्देश घेऊन राणा दाम्पत्य मुंबईत आले होते. मात्र ठाकरे सरकारला त्याची चीड आली आणि त्यांच्यामागे कार्यकर्ते आणि पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आला. त्याच्यापलीकडे जाऊन त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. धार्मिक आणि सामाजिक भावना लक्षात घेता हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अत्यंत निषेधार्ह आहे. पोलीस कोठडीतून नवनीत राणा आणि रवी राणा यांची सुटका झाल्यानंतर मी त्यांची मुंबईत भेट घेणार आहे असं सोमय्यांनी सांगितलं.हिंमत असेल तर त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला करायला गुंड पाठवावेत, असं आव्हानही सोमय्यांनी ठाकरे यांना केलं आहे.