साधूच्या वेशात असलेल्या टोळी सक्रिय; गळयातील चैन लंपास केल्याच्या दोन घटना

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:35 IST)
नाशिक-साधूच्या वेशात असलेल्या टोळीने गळयातील चैन लंपास केल्याच्या दोन घटना घडल्या आहे. या टोळीत साधुसह एक महिला व इतर काही जण असल्याचे बोलले जात आहे. पहाटे घराबाहेर पडणा-यांना या टोळीने लक्ष केले असून ही टोळी कारमधून फिरत आहे. पत्ता विचारण्याचा बहाणा किंवा रूद्राक्ष मणी देण्याचे निमित्त करुन ही टोळी चैन लंपास करत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरी तर मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिंडोरीरोड भागातील भगीरथ रामचंद्र शेलार (६९ रा.बजाज शोरूममागे,शिवागीनगर) हे मंगळवारी सकाळी शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. ओमनगर येथील किशोर सुर्यवंर्शी मार्गाने सव्वा सहा वाजेच्या सुमारास ते पायी जात असतांना प्रमिला आश्रम जवळ पांढ-या कारमधून आलेल्या चालकाने त्यांना थांबविले. यावेळी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठीचा मार्ग विचारण्यात आल्याने शेलार कारजवळ गेले असता ही घटना घडली. कारमधील साधूने शेलार यांना जवळ बोलावून घेत आशिर्वादरूपी रूद्राक्षमणी व शंभर रूपयांची नोट शेलार यांच्या हातावर ठेवली. 
 
त्यामुळे शेलार यांनी विश्वासाने गळय़ातील सुमारे ३५ हजार रूपयांची सोनसाखळी काढून बाबाकडे रूद्राक्षमणी लावण्यासाठी दिली असता त्यांना बोलण्यात गुंतवून लॉकेट घेवून पोबारा केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरी घटना गोविंद नगर भागात घडली. पहिल्या घटनेस ४५ मिनीटे उलटत नाही तोच ही घटना घडली. उत्तम रामचंद्र परदेशी (७५ रा.पीस स्क्वेअर अपा.योगेश्वरनगर,गोविंदनगर लिंकरोड) हे मंगळवारी ६.४५ वाजेच्या सुमारास आरडी सर्कल भागात मॉर्निंग वॉक करीत असतांना ही घटना घडली. 
 
ऋषी हॉटेल जवळून ते पायी जात असतांना कारमधून आलेल्या टोळक्याने पंचवटीकडे जाण्याचा मार्ग विचारला. यावेळी परदेशी यांना जवळ बोलावून घेतल्याने ते कारमधील बाबाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता बाबाने तुमचे कल्याण होईल असे म्हणत हातावर रूद्राक्षमणी ठेवला. याप्रसंगी परदेशी यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी रूद्राक्षमणी सोन्याच्या सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या गोफ मध्ये लावून देण्याचा बहाणा केला. परदेशी यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने पोबारा केला. हे टोळके पसार झाल्यानंतर परदेशी यांना सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती