राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन केलेल्या विधानावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना माझ्या वक्तव्यावर मी अजूनही ठाम असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
"समता परिषदेच्या व्यासपीठावर माझ्या कार्यकर्त्यांसमोर मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देव कुणाला मानावे आणि कुणाची पूजा करावी याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुठलाही माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी स्वतः माझ्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो. सप्तशृंगी कोटमगाव देवीच्या दर्शनालाही जातो. मात्र कोणता देव मानावा आणि कोणाची पूजा करावी हे माझे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा या वक्तव्याशी संबंध नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये," असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.