अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरपूर गावातही ही घटना घडली. या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. येथे गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने त्यांनी गाव सोडले. या सर्व ग्रामस्थांनी गावाच्या वेशीजवळ धरणे सुरू केले आहे. बुधवारी रात्रीपासून गावावर बहिष्कार टाकून कडाक्याच्या थंडीत गावाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. पाणी मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
येथे गेल्या 28 दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. गावच्या सरपंचाने हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी करत आहे. ग्रामपंचायतीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या 28 दिवसांपासून पाणीपुरवठा केला नसल्याचा आरोप होत असून पाण्याच्या मागणीसाठी गावातील लोक रात्रीपासून कुटुंबासह गावाबाहेरील विहिरीजवळ ठाण मांडून आहेत.
आपल्या गावात पाण्याची ही समस्या गेल्या 20 वर्षांपासून असल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलं आहे. त्यातच आता ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. 28 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला. या गावातील अनेक नागरिक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत विहिरीजवळ बसले आहेत.