पेडणेकर यांच्याकडून आदित्य ठाकरे यांची पाठराखण, म्हणाल्या आदित्य शिवसेनेच्या भल्याचाच निर्णय घेतील

मंगळवार, 11 जानेवारी 2022 (15:16 IST)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे  असल्याचेही बोलले जात आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत, आदित्य ठाकरे शिवसेनेच्या भल्याचाच निर्णय घेतील, असे म्हटले आहे. 
 
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, वयाचे काय घेऊन बसलात, तुम्ही मनाने तरुण राहिले पाहिजे. मुंबईत शिवसेनेचे मनाने 'तरुण' असलेले नगरसेवक उत्तमरित्या काम करत आहेत. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वयाच्या चाळीशी-पंचेचाळीशीत असलेले शाखाप्रमुख आणि आणि नगरसेवक ही आदित्य ठाकरे यांची शस्त्र आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना डावलणार अशी आवई उठवून या लोकांच्या मनात शिवसेनेविषयी राग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन आदित्य ठाकरे यांच्या शस्त्रांची धार बोथट होईल, असा दावा पेडणेकर यांनी केला.
 
शिवसैनिकांना आपल्याला पक्षाने कुठून कुठपर्यंत नेऊन ठेवले, याची जाणीव आहे. त्यामुळे पक्ष घेईल तो निर्णय सगळयांना मान्य असतो. निवडणुकीत हेवेदावे होतात, मांडीला मांडी लावून बसणारे विरोधात जातात, पण हे सर्व तात्पुरते असते. जो चांगलं काम करत असेल त्यालाच पक्ष तिकीट देतो. त्यामुळे तिकीट वाटपाच्या १५ दिवसांत सर्व परिस्थिती कशी हाताळायची, हे एक टेक्निक असतं. ते आम्ही इतरांसमोर उघड का करावं? आम्ही यावेळची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहोत. ते जे निर्णय घेतील, ते पक्षाच्या हिताचेच असतील, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती