खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही - चंद्रकांत पाटील

सोमवार, 19 एप्रिल 2021 (07:44 IST)
मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं सांगत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. यावर भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही असं खुलं आव्हान गृहमंत्र्यांना दिलं आहे. 
 
पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनच्या ५० हजार वाईल्स येत आहेत. त्यासंदर्भात चौकशीसाठी ब्रुक फार्माच्या संचलांकाना पोलिसांनी शनिवारी पोलीस स्टेशनमध्ये बोलवले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि इतर नेते पोहोचले. त्यांनी या व्यक्तीला का आणि कशासाठी बोलावलं असा सवाल केला. विरोधी पक्षनेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. येत्या काळात या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा दिलीप वळसे-पाटील यांनी दिला. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी आम्ही घाबरत नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
 
गुन्हा दाखल करा, घाबरत नाही आम्ही. अनिल देशमुख असेच धमक्या देत गेले, असा इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिलीप वळसे-पाटलांना दिला. यावेळी त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला. केंद्रावर खोटे आरोप करुन राजकारण सुरु आहे. राजकारण थांबवा आणि लोकांचे जीव वाचवा. लोक संतापले आहेत. सरकार विरोधात जनतेचा उद्रेक होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती