मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील वर्षी मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करू दिली नव्हती. त्याच मराठा समाजाने यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्का मोर्तब केले आणि तत्पूर्वी राज्य सरकारने यासाठी ठोस कायदेशीर पूर्तता आणि पाठपुरावा केला. त्यामुळे न्यायालयीन कसोटीवर आरक्षण टिकले. याबद्दल मराठा समाजातून समाधान व्यक्त होत असून त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे समाजातर्फे धन्यवाद मानण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याची घोषणा केली. यावेळी आंदोलनास सहकार्य केलेल्या स्थानिक प्रमुख नेते मंडळींनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगून अनपट म्हणाले की, आंदोलनावेळी दाखल झालेले राज्यभरातील 13 हजारावरील युवकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रकरणातील अडचणी दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.