नाशिक जिल्हा बँकेचा अजब संतापजनक प्रकार गोठवली ६० हजार खाती

गुरूवार, 13 एप्रिल 2017 (22:18 IST)
नाशिक जिल्हा बँकेचा संतापजनक  कारभार समोर आला आहे. नाशिक जिल्हा बँकेने  ७ एप्रिल नंतर शेतकऱ्यांना कर्जवाटप करणे अपेक्षित आहे. मात्र  कर्ज वाटप झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी नवीन कर्ज मिळण्याच्या अपेक्षेने ३१ मार्च २०१७ पूर्वी बँकेत पैसे भरले होते, तर  अशी सर्व  खाती गोठवण्यात आल्याने नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटना आणि बँकेचे संचालक मंडळ यांच्या  झालेल्या बैठकीत संघर्ष बघावयास मिळाला.त्यामुळे एका जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणत खाती गोठवण्याचा हा पहिलाच प्रकार असून शेतकरी वर्ग कमालीचा चिडला असून जर कर्ज वाटप केले नाही तर संचालक मंडळावर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असे शेतकरी वर्गाने इशारा दिला आहे.
 
यामागे जिल्हा बँका रिजर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या सीआरआर व्याजदर आणि कर्ज पुरवठा आणि वसुली यांच्यात ताळमेळ ठेवू न शकल्याने राज्यातील १२ जिल्हा बँका आर्थिक संकटात    सापडल्या आहेत. कर्जमाफी मिळण्याच्या आशेमुळे बऱ्याच अंशी कर्ज परतफेड न झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत या जिल्हा बँकांची लायसन्स रद्द ठरण्याची भीती असल्यामुळे जिल्हा बँका वाचवण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये भरावे लागण्याची चिन्हे आहेत.संघटनेने जिल्हा बँकेला २५ एप्रिल पर्यंत हा प्रश्न  सोडवून कर्ज वाटप न केल्यास प्रत्येक शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा