हिमालयातल्या हिमनद्या वेगानं वितळताहेत, लाखो लोकांवर होणार परिणाम?

- रिबॅका मॉरेल
कोल्ड वॉर गुप्त उपग्रहामधील फोटोंमुळे हिमालयातील हिमनद्या वेगानं वितळत असल्याचं समोर आलं आहे.
 
गेल्या 40 वर्षांत हिमालयातील हिमनद्या वितळण्याचं प्रमाण दुप्पट झाल्याचं लक्षात आलं आहे, असं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं आहे.
 
या अभ्यासानुसार 2000 पासून दरवर्षी हिमालयातल्या हिमनद्यांची उंची सरासरी 0.5 मीटरनं एवढी कमी होत आहे.
 
यासाठी हवामान बदल हे प्रमुख कारण असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
"हिमालयातल्या हिमनद्यांमध्ये दिवसेंदिवस कसा फरक पडत चालला आहे, हे या अभ्यासातून स्पष्टपणे लक्षात येतं," असं कोलंबिया विद्यापीठाच्या Lamont-Doherty Earth Observatoryच्या जॉसुआ मॉर्रर यांनी बीबीसीला सांगितलं.
 
Science Advances नावाच्या जर्नलमध्ये हा शोध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 
1970 ते 1980मध्ये हेक्सागॉन नावाच्या एका उपक्रमाअंतर्गत अमेरिकेनं 20 उपग्रह अंतराळात पाठवले. या कार्यक्रमांतर्गत पृथ्वीचं गुप्तपणे चित्रीकरण करण्यात आलं.
 
2011मध्ये हा अभ्यास सार्वजनिक करण्यात आला आणि US Geological Surveyनं शास्त्रज्ञांच्या वापरासाठी या माहितीचं डिजिटलायजेशन केलं.
 
या कार्यक्रमांतर्गत हिमालयाचे काही फोटो काढण्यात आले, त्यातून हिमालयाबद्दलची बरीच दुर्मीळ माहिती समोर आली.
 
या फोटोंची आताच्या NASA आणि Japanese space agency (Jaxa)च्या फोटोंशी तुलना केल्यास हा भाग कसा बदलला आहे, हे लक्षात येतं.
 
कोलंबिया विद्यापीठाच्या टीमनं 2 हजार किलोमीटर परिसरातल्या 650 हिमनद्यांची पाहणी केली.
 
यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की, 1975 ते 2000 या 25 वर्षांत दरवर्षी सरासरी 4 अब्ज टन बर्फ हिमालयानं गमावला आहे. पण 2000 ते 2016 या काळात हिमालायाने 8 अब्ज टन बर्फ गमावला आहे.
 
तसंच बर्फ वितळण्याचं प्रमाण एकसारखं नाहीये.
 
"हिमनद्यांचं खालच्या भागातील बर्फ वितळण्याचं प्रमाण अधिक आहे. यांतील काही भाग दरवर्षी सरासरी 5 मीटरनं वितळत आहे," ते पुढे सांगतात.
 
वैज्ञानिक समुदायात या विषयावर काही वादविवाद आहेत. या क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीतील बदल आणि औद्योगिक प्रदूषणामुळे बर्फ वितळत आहे, असं म्हटलं जात आहे.
 
हे घटक कारणीभूत आहेच, पण याहीपेक्षा हिमालयातील वाढतं तापमान यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे, असं कोलंबिया टीमनं म्हटलं आहे.
 
"बर्फ वितळण्याचं प्रमाण बहुतेक ग्लेशियरमध्ये सारखचं आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर आहे. ही गोष्ट सूचित करते, सगळ्याच हिमनद्यांना प्रभावित करणारं कोणतं तरी बल कार्यान्वयित आहे," ते पुढे सांगतात.
 
बर्फ नियमितपणे वितळत राहिल्यास त्याचा मोठा परिणाम होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
अल्पकालीन परिणाम म्हणजे, बर्फ वितळण्याचं प्रमाण अधिक वाढल्यास पूर येऊ शकतो.
 
दीर्घकालीन परिणाम म्हणजे दुष्काळाच्या काळात हिमनद्यांच्या वितळलेल्या पाण्यावर अवलंबून असलेले लाखो लोकांचं आयुष्य खडतर होऊ शकतं.
 
या अभ्यासाविषयी British Antarctic Surveyचे डॉ. हेमिश प्रिचर्ड सांगतात, "हवामानातील बदलामुळे संपूर्ण हिमालयाच्या पर्वतरांगेतील हिमनद्या वितळण्याची प्रक्रिया कशी वाढली आहे, हे या अभ्यासातून समोर येतं. खूप काळापासून बर्फ वितळण्याचं प्रमाण दुप्पट झालं आहे आणि त्यामुळे हिमनद्या बारीक होत आहेत."
 
जेव्हा बर्फ संपेल तेव्हा आशियातल्या काही नद्यांचं पाणी कमी होईल. हिमनद्यांशिवाय दुष्काळाची दाहकता आणखी वाढेल. लाखो लोकांच्या आयुष्यावर यामुळे परिणाम होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती