महाराष्ट्रातील 6 जागांसह राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान

सोमवार, 29 जानेवारी 2024 (16:51 IST)
Rajya Sabha Election 2024 निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यसभा निवडणूक 2024 संदर्भात मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांचाही समावेश आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सांगितले की, 27 फेब्रुवारी रोजी 15 राज्यांतील 56 राज्यसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. तर 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
 
13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा राज्यसभा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्रातील 6 खासदार आहे ज्यांचा कार्यकाळ या वर्षी संपत आहे.
 
कुठे किती जागांवर लढत?
ECI नुसार, ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यापैकी सर्वाधिक उत्तर प्रदेश (10), महाराष्ट्र (6), बिहार (6), पश्चिम बंगाल (5), मध्य प्रदेश (5), गुजरात (4), कर्नाटक (4), आंध्र प्रदेश (3), तेलंगणा (3), राजस्थान (3), ओडिशा (3), उत्तराखंड (1), छत्तीसगड (1), हरियाणा (1) आणि हिमाचल प्रदेश (1) आहेत. 
 
 
महाराष्ट्रातील कोणते खासदार निवृत्त होणार?
 
1- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
2- केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
3- केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार व्ही मुरलीधरन
4- काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
5- शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
6- राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार वंदना चव्हाण.
 
68 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ या वर्षी संपणार असल्याची माहिती आहे. त्यात 9 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. या वर्षी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत. भाजपच्या 60 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. त्यात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती