एकनाथराव खडसेंची आता ‘या’ प्रकरणात चौकशी करण्याची मागणी

गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (15:44 IST)
भोसरी जमीन घोटाळ्यात ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव  खडसे आणखी गोत्यात आले आहेत. कारण शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी खडसे यांना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खडसे यांना दिलेल्या दाखल्यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडे तपासणीचे सीसीटीव्ही फूटेज, डॉक्टरांचा तपशील माहिती अधिकारात मागविला आहे.
 
काही दिवसापूर्वी भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्याकडे अपंगत्वाचा दाखला आला कुठून? असा प्रश्न उपस्थित केला होता. आ.महाजन यांनी चक्क खडसेंच्या अपंगत्वाचा दाखलाच प्रसारमाध्यमांसमोर दाखविल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी अधिक माहिती घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज केला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
काय म्हटले आहे निवेदनात
या निवेदनात मालपुरे यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे हे राज्यातील वजनदार नेते आहेत. त्यांनी १२ ऑगस्ट रोजी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना ६ सप्टेंबर रोजी अपंगत्वाचा दाखला देण्यात आला. खडसे हे राजकीय वलय असलेले नेते आहेत. त्यांना शासकीय खर्चाने संरक्षण दिले जात आहे. येत्या ६ सप्टेंबरपर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दिली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून खोटे प्रमाणपत्र दिलेले असल्यास अधिकारी व तज्ञ डॉक्टर यांच्यासह माजी मंत्री खडसेंवर कारवाई करावी, अशी मागणी गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे माहितीच्या अधिकरात खडसे यांनी अंपगत्वासाठी केलेला अर्ज, त्यांची तपासणी झाली तेव्हाचे सीसी टीव्ही फूटेज तसेच तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे तपशील देखील मालपुरे यांनी मागविले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती