"माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे," असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
भाजप प्रवेशाच्या घडामोडीबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, "खडसेंकडे गावातील ग्रामपंचायतही नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय, विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगीही पराभूत झाली आहे, बँकची सत्ताही गेली, आता त्यांच्याकडे काय राहिले आहे? जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता?" असा सवाल महाजन यांनी केला आहे.