पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी बाहेर काढणार आहे. जे आम्हाला धमक्या देताय, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार, ईडीची नोटीस तिकडे जाणार, पुढच्या आठवड्यात त्याच ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार, क्रिमिनल सिंडिकेट इथेच बसून मी बाहेर काढणार आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. शिवसेना नेते विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर, संजय राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, माझे सहकारी खासदार विनायक राऊत गेल्या दोन वेळा तिम्पाट असूनही कोकणात प्रचंड विजय मिळवला. कोणावर विजय मिळवला आपल्याला माहीत आहे. आमदार सदा सरवणकर, अरविंद भोसले इथे आहेतच, मी इथे पत्रकार परिषद ऐकण्यासाठी आलोय. आपण पाहिलं असेल आता हे जे कोणी किरीट सोमय्या आहेत, त्यांचे गेले चार दिवस मी रोज एक प्रकरण देतोय. आजसुद्धा दिलंय. पालघरला एका गावात त्यांचं एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपये त्या प्रोजेक्टची किंमत आहे. त्यांच्या मुलाच्या नावानं आणि त्यांची पत्नी मेधा किरीट सोमय्या या प्रोजेक्टच्या डायरेक्टर आहेत. या 260 कोटींमध्ये ईडीचे डायरेक्टर आहेत, त्यांचे किती पैसे आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी ईडीच्या एका संचालकाची आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.
260 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टमध्ये किरीट सोमय्यांचा मुलगा नील किरीट सोमय्या आणि पत्नी मेधा किरीट सोमय्या हे कोटी कोटी रुपये यांच्याकडे कुठून येतात, त्याच्या आधी मी वसईतल्या निकॉन प्रकल्पाची काही हजार कोटींची जी राकेश वाधवानकडून घेतलेली जमीन आहे तिचा भ्रष्टाचार बाहेर काढलाय. हजारो, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार आता रोज बाहेर पडणार आहे. तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. ईडीच्या कार्यालयांना खंडणीखोर बनवलंय. ही तुमची खंडणी जमा करण्याची साधनं झालेली आहेत. क्रिमिनल सिंडिकेट या महाराष्ट्रात सुरू आहे. हे पूर्णपणे उघडं केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांचं तोंड काळं करणार आहे. कुणाला आमच्या अंगावर यायचं असेल तर त्यांनी जरुर यावं. तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल आणि एक दिवस तुम्हाला तोंड काळं करून इथून जावं लागेल, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय.