डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे ज्येष्ठ आंबेडकरी संशोधक हरपला

शनिवार, 4 मार्च 2017 (09:32 IST)
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
 
डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा ज्येष्ठ संशोधक व ग्रामीण-दलित साहित्याचा थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
 
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले की, डॉ. कृष्णा किरवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि संशोधक होते. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्राध्यापक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक या भूमिकेतून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास व संशोधन यांना चालना देण्याचे कार्य केले. दलित-ग्रामीण साहित्याचा शब्दकोष निर्माण करून त्यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १२५ महाविद्यालयांत एकाच दिवशी एकाच वेळी १२५ व्याख्याने आयोजित करण्याचा उपक्रम मी जाहीर केला. या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी आणि त्यानंतर या भाषणांचा संग्रह निर्माण करण्याच्या कामी डॉ. किरवले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षक म्हणून त्याचबरोबर विविध समित्यांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.

वेबदुनिया वर वाचा