काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय : अमोल कोल्हे

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (16:33 IST)
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी  केली. आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नाही. शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
 
“गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे, परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे, कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल,” असं खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती