सुशांतच्या आत्महत्येचं राजकारण करू नका: रोहित पवार

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:08 IST)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या करणं हे क्लेशदायक आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये. बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळू भाजू नका, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
 
रोहित पवार यांनी फेसबुकवरून हे आवाहन केलं आहे. रोहित यांनी सुशांतसिंहवर एक दीर्घ पोस्ट लिहून सुशांतच्या आत्महत्येवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण मुंबईत येतो काय… पाहता पाहता चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोचतो काय आणि एक दिवस अचानक दृष्ट लागावी तसं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षीच तो आत्महत्या करतो काय… अभिनेता सुशांतसिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
 
या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे, असं त्यांनी म्हटलं आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती