पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण

बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:21 IST)
पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहिर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याचे वाटप केले जात आहे. मदत छावण्यांमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांचे ताप, अतिसार आणि कावीळ या आजारनिहाय सर्व्हेक्षण देखील केले जात आहे. दरम्यान, राज्यभरात सध्या 570 वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे 196 तर सांगली येथे 144 पथके कार्यरत आहेत.
 
मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून तेथे ठेवलेल्या नोंदवहीत आजारनिहाय माहिती ठेवली जाते. दररोज सायंकाळी त्याचा एकत्रित डेटा तयार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
स्थलांतर करताना अनेक जण केवळ अंगावरील कपड्यावरच घराबाहेर पडले. ज्यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारासंबंधी औषधोपचार सूरू होता त्यांना दररोज गोळी घेता यावी,  त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन नये यासाठी, मदत छावण्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत का याची विचारणा आरोग्य कर्मचारी करीत आहेत. त्यांना सात दिवस पुरतील अशा गोळ्या देखील मोफत वाटप करण्यात येत आहेत. शासकीय दवाखान्यात या गोळ्या उपलब्ध नसतील तर खासगी दुकानातून विकत घेऊन त्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
 
काही भागात मदत छावण्यांमधून नागरीक घराकडे परतत आहेत. त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळीचा वापर कसा करावा याची देखील माहिती दिली जात आहे. गर्भवती महिलेस पाणी उकळून देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती