‘महागाई’च्या मुद्याला फाटा देण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ची चर्चा

सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (21:42 IST)
महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्या सगळय़ांना फाटा देण्यासाठी वा त्यावर पांघरूण टाकण्यासाठी ‘लव्ह जिहाद’सारखा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला जात आहे. तसेच यातून धर्माधर्मात भांडणे लावून त्यात जनतेला गुंतवून ठेवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
 
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे’तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी भुजबळ पुण्यात आले होते. भाजपचे जे शीर्षस्थ नेते आहेत, त्यांच्या कित्येक मुला-मुलींनी मुस्लीम धर्मियांबरोबर लग्न केले. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण येथे मुद्दाम धार्मिक भावना चेतवण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जात आहेत. निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी हिंदू-मुस्लिम लढाई सुरू झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जात आहे. नाशिक येथील ‘लव्ह-जिहाद’ विषयावर काढलेल्या मोर्चाबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले.
 
‘अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमात घेण्याविषयी निर्णय घेण्यासाठी कोणतीही अभ्यास समिती अस्तित्वात नाही. सध्या जे कुलगुरू आहेत, ते प्रभारी आहेत. त्यांना तो अधिकार नाही, कोणाची परवानगी नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार, असा मुद्दा उपस्थित करून आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे, असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. सगळय़ा धर्मात अशा काहीतरी गोष्टी असतील, त्याही अशाच शिकवाव्या लागतील. विज्ञान, इंजीनिअरिंग, फार्मसी, आयटी वगैरे आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का? त्यासाठी प्राणायाम करा, योगा करा. प्रत्येकाने आपापल्या घरात ते करावे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
 
अधिक वाचा : आपल्या राज्यात परतण्यासाठीच राज्यपालांकडून वादग्रस्त विधाने, अजित पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
 
मंत्रालयात फुले दांपत्याच्या तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर भिडे वाडय़ाच्या प्रश्नाबाबतही लवकर बैठक घ्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यावर एक महिन्यात ते काय निर्णय घेतील, ते पाहू, अन्यथा, आंदोलन तर आम्ही करणारच, असा इशारा त्यांनी दिला. मला परत जायचे आहे, असे राज्यपाल अनेक दिवसांपासून म्हणत आहेत. परंतु दिल्लीच्या लोकांनी त्यांना येथे ठेवले आहे. हवे ते काम राज्यपाल चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणून त्यांना कदाचित येथे ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती