दिलीप वळसे-पाटील यांची राजकीय कारकीर्द

सोमवार, 5 एप्रिल 2021 (23:34 IST)
दिलीप वळसे-पाटील 1990 साली आंबेगाव-शिरुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग सातवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
 
आतापर्यंत वळसे-पाटील यांनी ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण तसंच अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
ऊर्जामंत्री असताना भारनियमनाचं वेळापत्रक त्यांनी तयार केलं होतं. शिक्षण खात्याचा कारभार सांभाळताना त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉरिडॉर लिमिटेड (एमकेसीएल) या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.
 
युती सरकारच्या काळात विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने वळसे-पाटील यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता.
 
2009 ते 2014 या काळात दिलीप वळसे-पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते.
 
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कामगार तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाची जबाबदारी आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी कामगार मंत्री म्हणून बांधकाम मजुरांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय वळसे पाटील यांनी घेतला होता.
 
'महत्त्वाच्या पदासाठी प्राधान्य'
दिलीप वळसे पाटील यांच्या पक्षातील स्थानाबद्दल बोलताना मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या पिढीचा विचार केला तर अजित पवार, आर आर पाटील, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील हे चौघेजण पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जायचे. दुर्दैवाने, आर. आर. पाटील यांचं निधन झालं. अजित पवार हे शरद पवारांच्या शब्दाबाहेर जात नसले, तरी अनेकदा त्या दोघांमधल्या संबंधांमध्ये अस्वस्थता असल्याचंही समोर आलं आहे. अशापरिस्थितीत कोणतीही महत्त्वाची जबाबदारी द्यायची झाली तर त्यासाठी जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांचा विचार होणं स्वाभाविक आहे.
 
जयंत पाटील हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. तीन पक्षांच्या सरकारमध्ये राहून पक्षविस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच गृहमंत्रिपदासाठी शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांचा विचार केला असेल."
 
"काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात वळसे-पाटलांनी ऊर्जा खातं सांभाळलं. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विद्युत महामंडळाचं अन्बन्डलिंग करण्याचा निर्णय (महानिर्मिती, महावितरण, महापारेषण असं विभाजन) त्यांच्याच कारकिर्दीत झालं होतं. मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांनंतर त्यांना अनपेक्षितपणे विधानसभा अध्यक्ष बनविण्यात आलं. आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे अतिशय कळीचं मानलं जातं. दिलीप वळसे पाटील यांनी ते पद कार्यक्षमतेनं सांभाळलं," असं नानिवडेकर यांनी म्हटलं.
 
"गेल्या काही काळात ते तब्येतीच्या कारणांमुळे बाजूला पडल्यासारखे झाले होते. तब्येत सांभाळून पक्षासाठी आवश्यक त्या भूमिका बजावत होते. पण आता वाझे प्रकरणामुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे. त्यात गृहमंत्रालय केंद्रस्थानी आहे. अशावेळी दिलीप वळसे-पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरेल," असंही नानिवडेकर यांनी म्हटलं.
 
वादविवादांपासून दूर राहणारे नेते
दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू आहेतच. पण एक हुशार आणि अभ्यासू राजकीय नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी म्हटलं.
 
संदीप प्रधान यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षपद सांभाळल्यामुळे त्यांना कायदे आणि नियमांची जाण आहे. ते मितभाषी आहेत. त्यांनी विवादास्पद वक्तव्यं केल्याचं फारसं कधी दिसलं नाही.
 
वळसे-पाटील यांच्या ऊर्जामंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल सांगताना प्रधान यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात तेव्हा लोडशेडिंगची समस्या खूप तीव्र होती. त्यांनी कृषी क्षेत्रात सिंगल फेजिंग योजना अंमलात आणली आणि लोडशेडिंगची समस्या बऱ्यापैकी आटोक्यात आणली होती.
 
गृहमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यास सध्याच्या आरोप-प्रत्यारोपात पोलिस दलाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांवर असेल, असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती