लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून भाजप सत्तेवर - धनंजय मुंडे

शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (10:46 IST)
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून भाजप सत्तेवर आली. सरकारला अडीच वर्षे झाली, मात्र जनतेला काही अच्छे दिन आले नाहीत, नोटाबंदी मात्र झाली. मतदार राजाने आता जागे व्हावे, नाही तर आगामी काळात भाजपवाल्यांचा आणखी त्रास सहन करावा लागेल, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली. पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने धनंजय मुंडे गुरुवारी पुणे शहराच्या प्रचार दौऱ्यावर होते. वडगाव शेरी येथे आयोजित राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बापुसाहेब पठारे, बाबासाहेब गलांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार उपस्थित होते.
 
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोडी  यांनी अच्छे दिनचा नारा दिला. मात्र, सध्या जनतेचे हाल होत आहेत. अच्छे दिनच्या नार्या्ची आज सगळीकडे चेष्टा होत आहे. नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशातील सर्वसामान्य जनतेला बँकेसमोरील रांगांमध्ये उभे केले, मात्र काळा पैसा बाहेर आला नाही, महागाई दिवसागणिक वाढत आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. नवनव्या योजनांचे गाजर जनतेला दाखवले जात आहे. नोटाबंदीचा निर्णय धनदांडग्यांच्या सोयीसाठीच घेण्यात आल्याचा आरोप यावेळी मुंडे यांनी केला.
 
आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते, मात्र युतीचे सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दिले नाही. मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे हे सरकार बहुजन व मुस्लीम समाज विरोधी सरकार आहे, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा