सुमारे 23 देशांमधून आलेल्या भाविकांनी सप्तशृंगी देवी गडावर घेतले दर्शन

सोमवार, 3 एप्रिल 2023 (21:51 IST)
देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी गडावर चैत्रोत्सव यात्रा सुरु आहे.  लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी गडावर येत आहेत. अशातच रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे  सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि देशाबाहेरील म्हणजेच जवळपास 23 देशातील भाविकांनी गडावर हजेरी लावली असल्याचे दिसून आले. 
 
गडावर चैत्रोत्सव यात्रा सुरु असून कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव रस्त्यावर पायवाटेने हजारोंच्या संख्येने भाविक सप्तशृंगी गडावर जात आहेत. रविवारी सप्तशृंगी देवीच्या चरणी विदेशी पर्यटकांनी हजेरी लावत देवीची भजने म्हटली. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरु असल्याने देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यातच सहयोग ध्यान केंद्राच्या माध्यमातून 23 देशांमधल्या 56 विदेशी पर्यटकांनी वणी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी सप्तशृंगी मंदिरात या भाविकांनी जोगवा, गणेश अथर्वशीर्ष तसेच मराठी भजन गात सगळ्यांचेच लक्ष आकर्षित केले. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, टोकियो, इटली, यूएससह 23 देशांमधून हे भाविक गडावर दर्शनासाठी आले होते.
 
दरम्यान गुरुवारपासून सुरु झालेल्या सप्तशृंगी गडावरील चैत्रउत्सवाला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक भागातून भाविक भटक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. धुळे , नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा, रावेर या खानदेश पट्ट्यातूनही माहेरवाशीण दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी आहे. देवस्थान ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे 24 तास दर्शन खुले करण्यात आले आहे. प्रसादालयात मोफत अन्नदान होत असून त्याचाही लाभ भाविक घेत आहेत. गडावर दर्शनासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांवर दर्शन बारी लावण्यात आल्या आहेत

Edited by : Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती