मुख्यमंत्री यांचा दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद

मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (08:08 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील कोंडासावळी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला. कोंडासावळी परिसरातील शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे शेतीला झालेला प्रत्यक्ष लाभ तसेच कर्जमाफी योजना, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  
 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांचा तसेच जलयुक्त शिवार,जलसंधारणाची कामे, मागेल त्याला शेततळे आदींच्या योजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे तसेच गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
 
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सला महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, मदत व पुनर्वसनच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन राज्यातील सुमारे 1 लाख 40 हजाजर हेक्टर गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  त्यासाठी शेतकऱ्यांना गाळपेर जमिनी नाममात्र दरावर देण्यात येणार असून बियाणांचा पुरवठाही करण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती