शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न

सोमवार, 23 जुलै 2018 (08:36 IST)
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नसल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पंढरपूरऐवजी यंदा मुंबईतील वर्षा निवासस्थानीच ते पहाटेच्या वेळी विठ्ठलाची पूजा केली. आषाढीला पंढरपुरात जमलेल्या सुमारे १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट काही लोकांनी आखला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच महापूजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मानाचे वारकरी अनिल जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. तमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे ‘पांडुरंगा! राज्यात सुख, शांती नांदो!’अशी प्रार्थना वारकरी अनिल जाधव यांनी विठुरायाच्या चरणी केली.  लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. शासकीय महापूजेनंतर मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भपसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दिग्विजय सिंह, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोनि श्रीकांत पाडुळे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती