कोब्राने चावा घेतल्यानंतरही डॉक्टरांमुळे युवकाचे वाचले प्राण

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (07:46 IST)
लासलगाव :- निमगाव वाकडा येथील चेतन सयाजी गायकर (वय 36) या युवकास कोब्रा जातीच्या नागाने चावा घेतल्यानंतर गंभीर परिस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एकुतला एक मुलाचे प्राण वाचवल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले.
 
आज सकाळी 9.30 वाजता चेतन आपल्या शेतातील सोयाबीनच्या पिकातून जात असताना त्याच्या डाव्या पायाला कोब्राने चावा घेतला. ही गोष्ट चेतनच्या लक्षात येतात त्याने आपला डावा पाय जोरात झटकला परंतु तो कोब्रा पायालाच चिटकलेला होता. त्याने पुन्हा प्रयत्न करून कोब्राला बाजूला केले.
 
त्यानंतर चेतनने तातडीने मोबाईलद्वारे आपल्या वडिलांशी संपर्क करून घटना सांगितली. वडिलांनी त्वरित आईच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेले. दरम्यान, घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर चेतनची गाडीवरच शुद्ध हरपली आणि त्याने आईच्या अंगावर मान टाकून दिली. अशा परिस्थिती वडिलांनी वेळ न घालवता आपल्या एकुलत्या एक मुलाला आईच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले. तोपर्यंत विष सर्व शरीरात पसरलेले होते.
 
घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पाटील यांनी आपल्या स्टाफच्या मदतीने तातडीने उपचार सुरू केले. सुरुवातीला त्याला 15 इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर पुन्हा 7 इंजेक्शन देऊन चेतनची शुद्ध थोड्याफार प्रमाणात आल्यानंतर डॉक्टरांनी शर्तीने चेतनला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
 
एक तासाच्या प्रयत्नानंतर चेतन पूर्ण संकटातून बाहेर आल्यानंतर त्याचे वडील सयाजी गायकर व आई सिंधुमती गायकर यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी डॉ. स्वप्नील पाटील यांचे तुम्ही आम्हाला देवदूत भेटलात अशा शब्दात त्यांचे आभार मानले.
 
    चेतनला दवाखान्यात आणले तेव्हा परिस्थिती अतिशय गंभीर होती. पण त्याच्या आई-वडिलांनी वेळ न घालवता योग्य वेळेत त्याला दवाखान्यात दाखल केले त्यामुळेच चेतनचा जीव वाचला. त्याला स्टाफच्या मदतीने सलग एक तास वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्याचे प्राण वाचवू शकलो.
 
    – डॉ.स्वप्निल पाटील (वैद्यकीय आधिकारी, ग्रामीण रुग्णालय लासलगाव)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती