एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा काढण्याचा महाविकास आघाडी सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. तुम्ही मागाल तेच मिळणार नाही. त्यामध्ये व्यवहारी ताेडगा काढावा लागेल, असा इशारा वजा सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिला. श्रीवर्धन-दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापणा आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. अजीत पवार हे नेहमीच आपल्या सडेताेड व्यक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. पवार यांची आंदाेलकांप्रती कणव असली तरी, त्यांचे हे व्यक्तव्य आंदाेलक कशा पद्धतीने घेतात हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे.सरकार दाेन पावल माग यायला तयार आहे, तुम्हीही दाेन पावल मागे या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आंदाेलकांना केले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर सरकार प्रामाणिकपणे ताेडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू आंदाेलनाला नेतृत्वच नसल्याने चर्चा काेणा बराेबर करायची असा सवाल पवार यांनी केला.
एसटी ही सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन आहे. शेतकरी, कष्टकरी, गरीब, विद्यार्थी यांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे आंदाेलकांनी आपले आंदाेलन तानून धरु नये. ताणल्याने तुटते, असेही पवार यांनी स्पष्ट केले. अन्य राज्या प्रमाणे तेथील चालक, वाहक यांना पगार अथवा मानधन देण्यात येते. तशा पध्दतीने तुम्हाला देण्याबाबतचा प्रयत्न आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन करु या. मुख्यमंत्री देखील याला पाठींबा देतील. तुम्ही विश्र्वास ठेवा असेही पवार यांनी सांगितले.